आधुनिक शेतीची वाटचाल गौरवास्पद – रणजित देसाई

2

सिंधुदुर्गनगरी, ता.०१: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन कृषि तंत्रज्ञान आत्मसात करुन आधुनिक शेती करण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. शेतकऱ्यांची ही वाटचाल गौरवास्पद असून भविष्यात त्यांच्या आर्थिक उन्नतीचे द्योतक ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पणदूर येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कुडाळ पंचायत समिती व पणदूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पणदूर, ता. कुडाळ येथील सदगुरू कृपा मंगल कार्यालयात कृषि दिन व जिल्हा स्तरीय कृषि मेळाव्यात श्री. देसाई प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव शेळके, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पणदूर सरपंच दादा साईल, उप सरपंच महादेव सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय कृषि मेळाव्या निमित्त पणदूर हायस्कूल ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत वृक्ष लागवडी संदर्भात रॅली काढण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले.

या मेळाव्यास पणदूर पंचक्रोशी तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषि अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

1

4