जिल्हा बँकेला राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांकावर नेणार… सतीश सावंत ; जिल्हा बँकेचा वर्धापन दिन, शेतकरी मेळावा उत्साहात साजरा…

184
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १ : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँकांच्या तोडीसतोड काम करत असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी जिल्हा बँक विविध योजना राबवीत आहे. यातून बँकेपेक्षा शेतकर्‍यांना किती फायदा होतो हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांची आर्थिक पत निर्माण करण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे. येत्या काळातही बँक शेतकर्‍यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविणार असून सहकार क्षेत्रात केवळ राज्यातच नव्हे तर देशात जिल्हा बँकेला एक नंबरवर न्यायचे आहे. आपल्या जिल्हा बँकेला मोठे करण्याचे काम शेतकरी आणि सामान्य ग्राहकांचेच आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज कट्टा येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे बँकेचा ३६ वा वर्धापन दिन व कृषिदिनाचे औचित्य साधून आज कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, संचालक व्हिक्टर डांटस, नाबार्डचे जिल्हा महाप्रबंधक अजय थुटे, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सरोज परब, रामचंद्र मर्गज, प्रकाश गवस, दिगंबर पाटील, गुरुनाथ पेडणेकर, प्रज्ञा परब, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, प्रमोद धुरी आदी उपस्थित होते. अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्ताविक करत जिल्हा बँकेच्या ३६ वर्षाच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी दहावी बारावी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा स्तरावर उज्ज्वल यश संपादन करणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम केलेल्या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. सावंत म्हणाले, जिल्हा बँकेचे संचालक मंडळ व प्रशासन चांगल्या प्रकारे योग्य दिशेने काम करत आहे. म्हणूनच बँकेची प्रगती झाली आहे. संचालक मंडळाने घेतलेले सर्व निर्णय यशस्वीपणे राबविले गेले. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ४५० कोटी रुपयांच्या ठेवी असलेली जिल्हा बँक आज २ हजार कोटींच्या ठेवींपर्यंत पोचली आहे. सामान्य ग्राहक, शेतकरी, मच्छीमार यांच्या गरजा ओळखून त्यांना कोणत्या प्रकारच्या योजना फायदेशीर ठरतील याचा अभ्यास करूनच योजना राबविल्या आहेत. म्हणूनच प्रत्येक योजना यशस्वी ठरत आहे. जिल्ह्यात ४० एटीएम सेवा असणारी जिल्हा बँक एकमेव आहे. ग्राहकांमध्ये बँकेप्रति विश्वास निर्माण करून त्यांना ही बँक आपली बँक वाटली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
शेतकरी, मच्छीमार यांची पत सुधारण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे. शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे असून यासाठी बँक अर्थसाहाय्य करण्यास प्रयत्नशील आहे. शेतकर्‍यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. बँकेच्या बळीराजा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना ४ लाखाचे कर्ज देण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव कसा मिळेल यासाठी बँक प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काजूला जीआय मानांकन मिळाले असून बँकेमाफत जीआय मानांकनासाठी कार्यक्रम सुरू होणार आहे. जीआय मानांकन झालेल्या काजू बी ला जास्त दर मिळेल. शेतकर्‍याचा अपघात झाल्यास शेतकर्‍यांसाठी तीन वर्षासाठी विमा योजना राबविली जाणार असून १८ ते ७० वयोमर्यादा असलेल्या शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. तसेच शेतकर्‍यांच्या आरोग्यासाठी विशेष योजना सुरू करण्याचाही बँकेचा मानस असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
यावेळी श्री. देसाई यांनी जिल्हा बँक ही खर्‍या अर्थाने कृषी क्षेत्रासाठी काम करणारी बँक आहे. अनेक अडचणींवर मात करताना बँक शेतकर्‍यांसाठी काम करत आहे. केवळ व्यवसायिकतेचा विचार न करता सामाजिक विषयातही बँक काम करत आहे असे सांगितले. श्री. डांटस यांनी सर्वांचा जिल्हा बँकेवर विश्वास आहे. नफ्यापेक्षा जिल्हा बँक सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. बँकेच्या कारभाराचा आलेख चढता राहिला आहे. सतीश सावंत यांच्या सारखे सक्षम नेतृत्व बँकेला लाभले आहे. राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांना कर्जे नाकारत असताना जिल्हा बँक शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देत शेतकर्‍यांच्या व्यवसायास हातभार लावत आहे असे सांगितले. श्री. देवधर यांनी शेतीमध्ये अति यांत्रिकीकरण धोक्याचे ठरेल. यंत्रांबरोबरच बैल, म्हशी या प्राण्यांचाही वापर झाला पाहिजे. मालवण, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन विकासाचा फायदा इतर भागांनाही झाला पाहिजे. सी-वर्ल्ड प्रकल्प होणे गरजेचे असून त्यात जिल्ह्याचा विकास साधण्याची मोठी ताकद आहे. विकासाच्या प्रक्रियेत राजकारण आणू नये असे सांगितले.
सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. अनिरुद्ध देसाई यांनी आभार मानले. या मेळाव्यास तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.