नारायण राणेंनी निवडणूक न लढविल्यास दत्ता सामंत यांनाच उमेदवारी द्यावी…

2

स्वाभिमानच्या तालुका कार्यकारिणीत एकमुखी ठराव.
..

मालवण, ता. १ : येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांनी निवडणूक न लढविल्यास स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनाच उमेदवारी द्यावी असा एकमुखी ठराव आज महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास काही महिने शिल्लक असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात कुडाळ-मालवण मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार? यावरील चर्चेला उधाण आले आहे. स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे दिसून आले. यातच आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांनी निवडणूक न लढविल्यास जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनाच उमेदवारी द्यावी अशा आशयाचा एकमुखी ठराव घेण्यात आला.
एकीकडे आज कट्टा येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मेळावा पार पडत असताना आजच्याच दिवशी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची सभा घेण्यात आल्याने या दोन्ही सभांची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती. तालुका कार्यकारिणीची सभा कुंभारमाठ जानकी मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस शशांक मिराशी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश जावकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, बाळू कुबल, सभापती सोनाली कोदे, सुनील घाडीगावकर, अनिल कांदळकर, राजू परुळेकर आदी उपस्थित होते.
सभेत स्वाभिमान पक्षाच्या संघटना बांधणीविषयी चर्चा झाली. लवकरच जिल्हा परिषद मतदार संघनिहाय पक्षाच्या बैठका घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेत कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमान पक्षाचा उमेदवार कोण असावा? याविषयीची चर्चा रंगली. या चर्चेत व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच सभागृहातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली मते मांडली. यात स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आमचे दैवत आहे. १९९० पासून त्यांनी या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याबरोबरच कोकणचा विकास केला. त्यामुळे या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी. राणे यांचा प्रचार एकदिलाने, पूर्ण ताकदीने करू मात्र राणे यांनी निवडणूक न लढविल्यास स्थानिक आणि स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनाच उमेदवारी द्यावी. उमेदवारी देण्याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच अंतिम निर्णय घेणार असल्याने त्यांनीच आमच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा अशी मते पदाधिकार्‍यांनी मांडली.

14

4