मणेरीतील तिलारी प्रकल्पाचा डावा कालवा ढासळला

255
2

दोडामार्ग,ता.०२ : मणेरी धनगरवाडी येथे तिलारी प्रकल्पाचा डावा कालवा ढासळण्याच्या प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कालव्याची डाव्या बाजूची भिंतच कोसळल्याने त्याला लागून असलेल्या पादचारी पुलाला देखील धोका निर्माण झाला आहे. आधीच कमकुवत असलेली ही भिंत अतिवृष्टीमुळे ढासळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणाचे पाणी गोव्यात सोडण्यासाठी डावा व उजवा कालवा खोदण्यात आला आहे. या कालव्यातून सध्या गोव्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून तिलारीच्या कालव्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कालव्यांना भगदाड पडणे, कालवे ढासळणे, गळती लागणे असे प्रकार वारंवार घडल्याने प्रकल्पाच्या कालवा विभागावर मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी झाली. कालव्याची कामे निकृष्ट झाल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून तिलारीचा कालवा विभागात चांगलाच चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा मणेरी धनगरवाडी येथे डाव्या कालव्याची भिंत असल्याने खळबळ उडाली आहे. मनेरी धनगर वाडीतून गेलेल्या या कालव्याची डाव्या बाजूची भिंत कोसळून तिचा एक भाग कालव्यात पडण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या कालव्याला आंबेली व मणेरी ग्रामस्थांना पलीकडच्या शेतात शेतात ये जा करण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे या पुलाला देखील धोका निर्माण झाला आहे. मणेरी धनगरवाडी ते कुडासे दरम्यान कालव्याची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप यापूर्वी झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कालव्याची भिंत असल्याने कालव्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान आधीच कमकुवत असलेली ही भिंत अतिवृष्टीमुळे ढासळण्याचा अंदाज वर्तविला आहे.

कालवा विभाग अनभिज्ञ
तिलारी प्रकल्पाचा डावा कालवा मणेरी धनगरवाडी येथे ढासळण्याचा प्रकार उघडकीस येऊनही त्याचा पत्ता मात्र प्रकल्पाच्या कालवा विभागाला उशिरापर्यंत नव्हता. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कालवा विभागाचे कर्मचारी डागडुजीसाठी आले नव्हते. याबाबत कालवा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

4