नगराध्यक्ष समीर नलावडेंसह नगरसेवकांचा इशारा
कणकवली, ता.०२: कणकवली शहरातील पाणी निचरा होण्यासाठी हायवे अधिकारी आणि ठेकेदारासमवेत दहा बारा बैठका घेतला. संपूर्ण शहराची माहिती करून दिली. एवढेच नव्हे तर आंदोलन देखील केले. पण हायवे ठेकेदार आणि महामार्गचे अधिकारी मुजोर झाले आहेत. त्यांच्या बेपवाईमुळेच कणकवली शहरात पाणी तुंबले आणि नागरिकांचे तब्बल 83 लाख 30 हजाराचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई हायवे डिपार्टमेंट आणि ठेकेदाराने भरून द्यावयाची आहे. तसेच कणकवली शहरात जर पुन्हा पाणी तुंबले तर हायवेचे उपअभियंता शेडेकर आणि दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक गौतम यांना गडनदीपूलावर बांधून ठेवणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह स्वाभिमानच्या नगरसेवकांनी आज दिला.
श्री.नलावडे यांनी आज आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, अभिजित मुसळे आदी उपस्थित होते. श्री.नलावडे म्हणाले, निव्वळ ठेकेदाराच्या चुकीच्या कारभारामुळे दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसात कणकवली शहरात पाणी तुंबले होते. नगरसेवक अबिद नाईक यांच्यासह बंडू गांगण यांनी जेबीसी लावून नाला साफ केला अन्यथा शहरातील अनेक घरे पाण्याखाली गेली असती. मात्र असा प्रकार आम्ही पुन्हा खपवून घेणार नाही. सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे हायवे अधिकार्यांनी आणि ठेकेदाराने शहरातील रस्त्यांची गटारांची आणि नाल्यांची कामे करून घ्यावीत. पुन्हा जर शहरात पाणी आले तर आंदोलन करत बसणार नाही तर हायवे अधिकारी आणि ठेकेदाराच्या अधिकार्यांनाच गडनदी पुलावर बांधून ठेवणार आहोत.
माजी आमदार विजय सावंतांमुळे नालेसफाई थांबली
शहरातील विद्यानगर भागातून जाणारा नाला माजी आमदार विजय सावंत यांनी आपल्या कंपाऊंडमध्ये स्लॅब टाकून बंदीस्त केला आहे. मे अखेरीला नगरपंचायतीचे पथक सफाईसाठी गेले असता, त्यांना विजया सावंतांच्या माणसांनी कंपाऊंडमध्ये येण्यास मज्जाव केला. येथील अरूंद नाल्यामुळे देखील शहरात पाणी तुंबण्याची घटना घडली आहे. मात्र विजय सावंत यांच्या कॉम्प्लेक्समधील नागरिकांनी तक्रार नोंदवली तर नगरपंचायत कंपाऊंडमध्ये घुसून नाल्यावरील स्लॅब काढून टाकणार असल्याचीही माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.