मुदत संपल्यानंतरही देवलीत अवैधरित्या वाळू उपसा सुरूच… महसूलच्या कारभाराबाबत ग्रामस्थ संतप्त : कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा…

253
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २ : तालुक्यातील देवलीतील वाळू उत्खननाची मुदत ३० जूनला संपल्यानंतरही याभागात अनधिकृत वाळू उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. वाळू उत्खननाची मुदत संपण्यापूर्वी दहा ते बारा दिवस खनिकर्म विभागाने तहसीलदारांना अनधिकृत वाळू उत्खनन होऊ नये, याची खबरदारी घेण्याची सूचना केल्यानंतरही देवलीत मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या वाळूची चोरी केली जात आहे. त्यामुळे महसूलच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आज खनिकर्म विभागाला निवेदन देण्यात आले.
देवलीतील अनधिकृत वाळू उत्खननाला ग्रामस्थांनी पूर्वीपासूनच विरोध दर्शवला आहे. मात्र महसूल विभागाच्या आशिर्वादामुळे देवलीतील अनधिकृत वाळू व्यवसायाला पाठबळ मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वाळू व्यवसायिकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. ३० जूनला देवलीतील वाळू उत्खननाची मुदत संपल्यानंतर खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. गेले दोन दिवस हे प्रकार सुरु असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी याप्रकरणी आज जिल्हा खनिकर्म विभागाचे लक्ष वेधले आहे. देवली वाघवणे येथे राजरोसपणे अनधिकृत वाळू उत्खनन सुरु असून त्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे झोपी गेलेले महसूल प्रशासन यावर कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष लागले आहे.

\