ग्राहकातून नाराजी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा मनसेचा इशारा
सावंतवाडी, ता. ०३: विज वितरण कंपनीच्यावतीने विज बिलावर रिडींगची माहिती देणारे फोटो अचानक काढून टाकण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकार्यांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे विज ग्राहकांना रिडींगची माहिती मिळण्यास समस्या निर्माण होत आहे.
याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सावंतवाडी मनसेकडून पुन्हा रिडींगबाबत फोटो द्या, अशी मागणी विज अधिकारी भालचंद्र कुलकर्णी यांच्याकडे आज करण्यात आली. तसेच प्रसंगी पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीयांची बैठक घेवून पुढील निर्णय घेऊ असा इशारा मनसेच्या पदाधिकार्यांनी दिला.
सावंतवाडी शहरातील काही विज बिले सरासरी पद्धतीने काढण्यात आली आहेत. त्यामुळे तब्बल तीन ते चार महिने एकाच रक्कमेची बिले काही ग्राहकांना आली आहेत. याबाबतची माहिती विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी विज वितरण कार्यालयात गेले होते. यावेळी मनसेचे राजू कासकर, आशिष सुभेदार, संकेत मयेकर, संतोष भैरवकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक ग्राहकांना अशा प्रकारे रिडींगचे फोटो नसल्याने बिलाबाबत माहिती मिळू शकत नाही अशी खंत व्यक्त केली असून पुन्हा योग्यतो पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी केली. याबाबतचे पत्र वरिष्ठ कार्यालयाला देण्यात यावे आणि पुन्हा एकदा छायाचित्र बिलात समाविष्ठ करावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत मिटर रिडींग घेण्यासाठी गेलेल्या कर्मचार्याने दोन-दोन महिने बिलाचे रिडींग घेतले नसल्याचे उघड झाले. यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आता सर्व निविदा प्रक्रिया सिस्टीमनुसारच होणार आहेत. यामुळे आपोआप त्या कर्मचार्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले.