कर्जमाफितून वगळलेल्या संस्थांबाबत निर्णय घेण्यासाठी ९ जुलैला मंत्रालयात बैठक | आम. वैभव नाईक यांनी वेधले सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे लक्ष…

2

मालवण, ता. ३ : विकास संस्था म्हणून नसलेल्या परंतु सहकारी संस्था म्हणून नोंदणी असलेल्या जिल्ह्यातील चार सहकारी संस्थांच्या सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. हे निदर्शनास आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत या संस्थांचा कर्जमाफीमध्ये समावेश करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली. त्याची दखल श्री. पाटील यांनी घेत ९ जुलैला दुपारी एक वाजता मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक बोलाविली आहे.
या बैठकीस आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस प्रधान सचिव (सहकार), सहकार आयुक्त, निबंधक, सहकारी संस्था, संबंधित संस्थांचे अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व इतर संबंधित अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.
जिल्ह्यातील वालावल विभाग कृषी उद्योग सहकारी संस्था संघ, कुडाळ सहकारी महादेवाचे केरवडे ग्राम स्वराज्य संस्था, देवी सातेरी महिला विकास सेवा सोसायटी निरवडे आणि माऊली महिला बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था न्हावेली या चार संस्थांची नोंदणी विकास संस्था म्हणून नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमधून त्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थांमधून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. याचा परिणाम संस्थांच्या कर्ज वसुलीवर होत आहे. त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. याकडे आमदार वैभव नाईक यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे लक्ष वेधले होते.

16

4