शिरवंडे लाड वाडीतील सार्वजनिक विहीर मुसळधार पावसात खचली… नवीन विहीर बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी…

2

मालवण, ता. ३ : शिरवंडे लाडवाडी येथील रस्त्यालगत असलेली सार्वजनिक विहीर मुसळधार पावसामुळे पूर्णतः खचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची पाण्याअभावी हाल होत असून ही गैरसोय दूर करण्यासाठी तत्काळ नवीन विहीर बांधून मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
शिरवंडे लाडवाडी येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या फंडातून सन २००५ मध्ये मोठी सार्वजनिक विहीर बांधली होती. या भागातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरीवर पंप बसविले होते. मात्र गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही विहीर पूर्णतः खचून गेली. परिणामी सर्व पाण्याचे पंप विहिरीत पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहे. या नुकसानीची पंचयादी घालण्यात आली आहे. तरी ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी याठिकाणी तत्काळ नवीन विहीर बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

9

4