iसिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवतानाच याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत असलेला पंकज राऊळ याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी २० हजार रुपयांचा सशर्त जामिन मंजूर केला आहे. राऊळ याच्यावतीने वकील विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांनी काम पाहिले.
लग्नाचे आमिष दाखवत पंकज राऊळ २५ राहणार तेंडोली वरची आदोस ता. कुडाळ याने १२ एप्रिल २०१९ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बंद घरात बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले होते. याबाबत कुणाला सांगितले तर ठार मारेन अशी धमकी दिली असल्याची तक्रार २ मे २०१९ रोजी पीडित मुलीने निवती पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार पंकज राऊळ याच्या विरोधात पोलिसांनी भादवी कलम ३७६(१) (ए), ५०६, ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला ८ मे रोजी अटक केली होती.
८ मे रोजी न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली होती. त्यानंतर त्याने केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. आता दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा पंकज याने आपल्याला जामिन मिळावा यासाठी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. हा जामिन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.