सतीश धोंड:बूथ कार्यकर्ता मेळाव्याद्वारे भाजपचे वेंगुर्लेत शक्तीप्रदर्शन
वेंगुर्ले : ता.३
वेंगुर्ला तालुक्यात भाजपचा पाया आणखीन मजबुत करण्यासाठी सदस्य मोहिमेमध्ये सहभागी व्हा. लोकसभा निवडणुकीत खा.विनायक राऊत यांना वेंगुर्ले तालुक्यात मिळालेले लीड हे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे मिळाले. युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्यांना पुन्हा आमदार करण्यासाठी नव्हे,तर आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आमदार होण्यासाठी प्रयत्न करा,असे प्रतिपादन भाजपाचे कोकण – गोवा संघटन मंत्री सतीश धोंड यांनी वेंगुर्ले येथे केले.
भाजपा बुथ कार्यकर्ता मेळावा आज बुधवारी येथील साई दरबार हॉल येथे संपन्न झाला. यावेळी भाजपने मोठे शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री. धोंड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस राजन तेली, भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,पं. स.उपसभापती स्मिता दामले, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, विस्तारक पंकज बुटाला, राम भोजने, साईप्रसाद नाईक, प्रशांत प्रभुखानोलकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, महिला तालुकाध्यक्ष मनाली करलकर, माजी जि. प.सदस्य बाबा राऊत तसेच बाबा नाईक, बाळा सावंत, वेतोरे सरपंच राधिका गावडे, निवती सरपंच भारती धुरी, तुळस सरपंच शंकर घारे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, लोकसभेत भाजपची ताकत सर्वांना समजली,त्यामुळे अजून भाजपा तळागाळात पोहचली, नोकरीसाठी आपल्या मतदारसंघातील मुले गोव्याला कामाला जातात, येणाऱ्या काळात रोजगार आपल्या मतदार संघात प्राप्त करून देणार,सी वर्ल्ड शिवसेनेमुळे रखडला त्यामुळे रोजगार रखडला ,रोजगार हवा असल्यास आलेल्या प्रकल्पांना साथ द्या, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊया,भाजपा अजून लोकांपर्यंत पोहचवूया,नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे सिंधुदुर्ग मध्ये विकास दिसतोय असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी करताना तालुक्यात सुरू असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. यावेळी राम भोजने, स्नेहा कुबल, पंकज बुटाला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाम चंद्रकांत सावंत यांची केंद्र सरकरच्या कमिटीवर नियुक्ती झाल्याबद्दल राजन तेली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मच्छिमार नेते दादा केळुसकर व माजी शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे यांना जिल्हा कार्यकारिणी सदस्य नियुक्तीपत्रे देण्यात आली. पाल ग्रा प सदस्या संध्या गावडे व अन्य एकूण ३२ कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी नगरसेवक श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगावकर, रमेश नार्वेकर, शिरोडकर आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार काका सावंत यांनी मानले.