आम्ही दोरी तयार ठेवलीयनगराध्यक्षांनी अभियंता, ठेकेदाराला बांधूनच दाखवावे

364
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर यांचे आव्हान

कणकवली, ता.3 ः नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग उपअभियंता शेडेकर आणि दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक गौतम यांना गडनदी पुलाला बांधून ठेवण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा नगराध्यक्षांनी खरा करून दाखवावा. शेडेकर आणि गौतम यांना बांधून ठेवण्यासाठी आम्ही दोरी तयार ठेवली असल्याचे आव्हान भाजपचे नगरसेवक कन्हैया पारकर आणि रूपेश नार्वेकर यांनी आज दिले.
नगरसेवक पारकर, नार्वेकर यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. श्री.पारकर म्हणाले, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे पाणी तुंबल्याचा दोष हायवे प्राधिकरण आणि ठेकेदाराला देत आहेत. पण नालेसफाई ही त्यांचीच जबाबदारी होती. तसेच आमदार नीतेश राणे यांनी देखील पावसाळ्यापूर्वी नगरपंचायतीमध्ये बैठक घेऊन पावसाळी कामांचा आढावा घ्यायला हवा होता. याबाबतच काहीच कार्यवाही झाली नसल्याने शहरात पाणी तुंबले आणि रहिवाशांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्याची भरपाई देखील नगरपंचायतीने द्यायला हवी.
पारकर म्हणाले, कणकवलीत पुन्हा पाणी तुंबले हायवे ठेकेदार आणि अभियंत्यांना बांधून ठेवण्याची धमकी कणकवली नगराध्यक्षांनी दिली आहे. शहरात नालेसफाई झाली नसल्याने अतिवृष्टीकाळात पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता आहे. अशी वेळ येईल तेव्हा नगराध्यक्षांनी ठेकेदार, अभियंत्यांना गडनदी पुलाला बांधूनच दाखवावे. आम्ही त्यासाठीची दोरी तयार ठेवली आहे.
कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे काम आठ महिने बंद होते. आमदार नीतेश राणे यांनी पुढाकार घेऊन व्यापारी, गाळेधारक, भाडेकरू, स्टॉलधारक आदींची एकत्र बैठक लावली. या सर्वांना वाढीव भरपाई, सर्वांना मोबदला, सर्वांचे पुनर्वसन अशी आश्‍वासने दिली. मात्र यातील एकही आश्‍वासन आत्तापर्यंत पूर्ण झालेले नाही. तसेच हायवे चौपदरीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे कन्हैया पारकर म्हणाले.

चतुर्थीमध्ये एक महिना काम बंद ठेवा
गणेशोत्सव कालावधीत महामार्ग चौपदरीकरणाचे कणकवली शहरातील काम एक महिना बंद ठेवण्यात यावे अशी मागणी आम्ही ठेकेदाराकडे केली आहे. ठेकेदाराने याबाबतची कार्यवाही न केल्यास काम बंद ठेवण्यास आम्ही भाग पाडू असा इशाराही श्री.पारकर यांनी दिला.

चौपदरीकरणात राणेंचे साटेलोटे
महामार्ग चौपदरीकरणातील त्रुटींविरोधात सर्व कणकवलीकर एकवटले होते. या सर्वांच्या ताकदीमुळे ठेकेदार आणि महामार्ग अधिकारी देखील शहरात येण्यास धजावले नव्हते. आमदार नीतेश राणेंनी मध्यस्थी केल्यानंतर शहरातील काम सुरू झाले. मात्र ही मध्यस्थीमागे राणेंचे आर्थिक साटेलोटे होते असा आरोप देखील श्री.पारकर आणि नार्वेकर यांनी केला.

\