दोडामार्ग स्वाभिमानचा मुखाधिकाऱ्यांना घेराव

2

दोडामार्ग,ता.०३:  नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत स्मशानभूमीच्या समस्येबाबत लक्ष वेधून सुद्धा प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांना मृतव्यक्तीवर अंत्यविधी करताना गैरसोयींना समोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना घेरावो घातला. नागरिकांची गैरसोय करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीकडून शहरातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण व मजबुतीकरणाचे काम केले जात आहे. गेल्या महिनाभरापासून हे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्ण झालेले नाही. सध्या कंपाऊंडचे काम सुरू असून ते अर्धवट स्थितीत आहे. मात्र असे असताना ठेकेदाराने कंपाउंड चे काम पूर्ण करण्या अगोदरच स्मशानशेडवरील पत्र काढून टाकले. त्यामुळे पावसाळ्यात मृत देहावर अंत्यविधी करताना नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जर नगरपंचायतीने त्यावर उपाययोजना केली नाही तर मृतदेह नगरपंचायतीच्या कार्यालयात आणण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी नगराध्यक्ष सौ. लीना कुबल यांनी तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे मंगळवारी शहरातील एका नागरिकाचे निधन झाल्यावर त्याच्यावर अंत्यविधी करताना गैरसोय झाली. परिणामी बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना घेरावो घालत जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत महिला शहराध्यक्ष सविता कासार, विनायक म्हावळणकर, नगरसेविका सौ. अदिती मणेरीकर, समीर गार्डी, फोंडू हडीकर, सागर मिस्त्री, संदेश गवस, मनसेचे शहरअध्यक्ष अभिजित खांबल उपस्थित होते.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी नागरिकांची गैरसोय करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल धारेवर धरण्यात आले. अखेर मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी स्मशान शेड होती तशी पूर्वरत करू अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिल्यावर हा घेरावो मागे घेण्यात आला. पण त्याच बरोबर आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

4