वैभववाडी/प्रतिनिधी: शिक्षकांच्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी एखाद्या शिक्षकांने दिलेल्या भरीव योगदानामुळे ती शाळा त्या शिक्षकाच्या नावाने ओळखली जाते. वैभववाडी सारख्या दुर्गम भागातील कोकिसरे हायस्कूल मध्ये प्रतिकूल परिस्थितीत आपल्या अथक परिश्रमाने क्रीडा शिक्षक चंद्रकांत यादव यांनी आपल्या शाळेचे नाव क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यात अग्रेसर ठेवले. असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष बयाजी बूराण यांनी वैभववाडी येथे काढले.
वैभववाडी तालुका क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने कोकिसरे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत यादव यांचा सेवानिवृत्तपर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बयाजी बूराण बोलत होते. हा कार्यक्रम नुकताच वैभववाडी येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे समन्वयक तथा राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार विजेते दत्तात्रय मारकड हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती चंद्रकांत यादव, सौ. गंगा यादव, अ. रा. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक यू. आर. दिनदयाळ, जिल्हा प्रतिनिधी टी. एम. देवकर, वैभववाडी तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष एस. टी. तुळसणकर, सचिव एस. आर. राठोड, यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दैवत मानून सेवा केली – चंद्रकांत यादव
माझ्या संपूर्ण सेवेत मी विद्यार्थ्यांना दैवत मानून सेवा केली. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी सुई दोराही सोबत बाळगला त्यामुळे विद्यार्थी व माझ्यात वेगळी नाळ जोडली गेली. कोकण ही माझी कर्मभूमी आहे. या मातीला, इथल्या प्रेमाला मी कधीच विसरू शकत नाही. ज्या शाळेत माझे मुल खेळली बागडली ,पडली, रडली, आणि आनंदाने नाचलीही या माझ्या शाळेतील या मैदानावरील माती मी घरी नेऊन त्यात एक झाड लावले आहे. त्यामुळे मी सदैव विद्यार्थ्यांसोबत राहिल्याचे समाधान मिळेल. क्रीडा शिक्षक महासंघ ही माझी मातृसंघटना आहे. माझ्यासंघटनेने केलेला गुणगौरव निश्चित मला प्रेरणादायी ठरेल. असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
यावेळी वैभववाडी तालुका क्रीडा शिक्षक महासंघ संघटनेच्यावतीने चंद्रकांत यादव यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार बयाजी बूराण यांनी केला तर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने दत्तात्रय मारकड यांनी सत्कार करीत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एस. टी. वाघमोडे, एस. एस. पाटील, यू. आर. दिनदयाळ, संजय राठोड, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रा. आर. बी. चौगूले, प्रितम जाधव, सौ. प्रिया देवकर यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी तुकाराम देवकर यांनी तर सुत्रसंचालन एस.के. राठोड यांनी केले.