सोळा तोळे दागिने लंपास :कर्नाटक येथील 30 युवकांकडुन प्रकार
सावंतवाडी/ अमोल टेंबकर,ता,०३ :* किरकोळ कारणावरून वाद घालून कर्नाटक येथील मद्यधुंद ३० हून अधिक पर्यटकांकडून मालवण येथील युवकांच्या गटावर हल्ला करण्यात आला.यात त्याच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या साखळ्या लांबविण्यात आल्या.यात सुमारे सोळा तोळ्याचे दागिने लंपास झाले आहेत.
हा प्रकार आंबोली कावळेसाद पॉईंट येथे आज सायंकाळी सात वाजण्याच्या घडला. दरम्यान जखमींना येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले आहे.
यातील सहा जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सिताराम सत्यवान पावसकर ३१,मनोज मधुकर वायंगणकर २८ ,विक्रम प्रकाश मुरकर २८, परेश गुरुनाथ बांदेकर २२ , चेतन प्रमोद मुसळे ३२,( सर्व रा.सुकळवाड मालवण) अशी त्यांची जणांची नावे आहेत.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. युवकांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण येथील युवक कावळेसाद पॉईंट वर मौज मजा करून कावळेसाद पॉइंट येथे पार्किंग मध्ये परतण्यासाठी थांबले होते. यावेळी त्याठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या कर्नाटक येथील पर्यटकांनी त्यांची मस्करी करण्यास सुरुवात केली व शिवीगाळ केली. याबाबतची विचारणा केल्यानंतर थेट लाठया काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत तब्बल ३५ जणांनी हल्ला केल्यामुळे सहा ते सात युवक जखमी झाले आहेत तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान त्या ठिकाणी तशाच अवस्थेत त्यांनी चंदगड पर्यंत पाठलाग केला .परंतू ते पळून जाण्यास यशस्वी झाले.
त्यानंतर, जखमी युवकांनी येथील कुटीर रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. दरम्यान त्यांचा हल्ला पूर्वनियोजित होता आमच्या गळ्यात सोनसाखळी बघून त्यांनी हा प्रकार केला असा संशय त्या युवकांनी व्यक्त केला आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर गौरेश जाधव आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांना माहिती दिली परब यांनी त्यांना तात्काळ आरोग्य सेवेसाठी सहकार्य केले.
_____________________