गुन्हे… दाखल झाले तरी चालतील, प्रकल्प बंद करणार नाही

356
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सर्वपक्षीय नगरसेवकांचा सावंतवाडीत इशारा : वाॅटर स्पोर्टस् वाद पेटण्याची शक्यता

सावंतवाडी, ता.०४ : वॉटर स्पोर्ट आणि स्कुबा डायव्हींग बंद करण्याच्या नोटीसा मेरीटाईम बोर्डाकडून देण्यात आल्यानंतर हा वाद आता पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान आज येथे झालेल्या नगरसेवकांच्या तातडीच्या बैठकित प्रसंगी अंगावर गुन्हे घेऊ, मात्र हा प्रकल्प बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी घेतली. नगराध्यक्ष बबन साळगावकर जी भूमिका घेतील त्याच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहू असे सांगितले.
येथील पालिकेच्या सभागृहात आज नगरसेवकांची तातडीची बैठक झाली. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपले विचार मांडले. यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो म्हणाल्या, हा प्रकल्प नगरपालिकेच्या तलावात आहे. त्यामुळे कोणाच्या धमक्यांना घाबरण्याचे कारण नाही. काही तांत्रिक बाबी असल्यास वकिलाचा सल्ला घ्या, मात्र प्रकल्प बंद करू नका. उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर म्हणाल्या, स्थानिक युवकांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळाला आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाला विरोध होणे चुकीचे आहे. कोणाला घाबरण्याची गरज नाही.
बाबू कुडतरकर म्हणाले, प्रकल्प कोणी बंद करत असेल तर ते चुकीचे आहे. प्रसंगी आंदोलन करून अंगावर गुन्हे घेण्याची आमची तयारी आहे.
सुधीर आडिवरेकर म्हणाले, या प्रकल्पाला विरोध करणार्‍या अधिकार्‍यांचा आम्ही निषेध करतो. नगराध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा कायम पाठिंबा आहे.
राजू बेग व डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, या प्रकारामागे नेमका झारीतील शुक्राचार्य कोण याचा शोध घेण्याची गरज आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणीतरी याला विरोध करत आहे. मात्र अशा धमक्यांना कोणी भीक घालू नये.
यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, सावंतवाडीचे मोती तलाव मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येत नाही. त्यांनी बजावलेली नोटीस ही वरवरची आहे. त्यांना तो अधिकार नाही. शहरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी पालिका वेगळे उपक्रम राबवू शकते. त्यामुळे आवश्यकती परवानगी घेऊन हा प्रकल्प सुरू केला आहे. काही ठिकाणी प्रशिक्षीत कर्मचारी आहेत, त्यामुळे कोणी विरोध करत असेल तर ते चुुकीचे आहे. यावेळी नगरसेवक उपस्थित होते.

\