मुंबईत सन्मान:सीईओ मंजूलक्ष्मी यांनी दिले होते विशेष लक्ष
सिंधुदुर्गनगरी ता.०४:
राष्ट्रीय ग्रामीण जिवन्ननोती अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कामकाजात २०१८-१९ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भौतिक कामात १८० टक्के तर आर्थिक उद्दिष्टात १५३ टक्के काम केले आहे.
बुधवारी याबाबत राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्हा कक्षाचा मुंबई येथे सन्मान केला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी विशेष लक्ष देत जिल्ह्यातील बँकांना कर्ज प्रस्ताव मंजूर करणे व कर्ज वाटप करणे प्रवृत्त केले होते. प्रभारी जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र पराडकर यांनीही यासाठी मेहनत घेतली होती.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्ननोती अभियान मुख्याधिकारी आर विमला, रवींद्र शिंदे यांच्याहस्ते हा सन्मान करण्यात आला. जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अरुणकुमार शहा, जिल्हा आर्थिक समायोजन व्यवस्थापक निलेश वालावलकर यांनी हा सन्मान स्वीकारला. या कामाबाबत जिल्हा ग्रामीण जिवन्ननोती अभियान कक्षाचे जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.