संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी ता.०४:
जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणूक तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी डाॅ दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे भेट घेऊन केली.
जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने यावर उपाय योजना केल्यास जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होईल. म्हणून गुरुवारी जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डाॅ पांढरपट्टे यांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मनोहर आंबेकर, सी. टी. कोचरेकर, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे केली असताना एसटी प्रवास सवलतीसाठी ही नव्याने करण्यात आलेली वयोमर्यादा ग्राह्य धरली जात नाही. तरी वयोमर्यादा ६० धरून एसटी प्रवास सवलत मिळावी. जेष्ठ नागरिकांचे आरोग्य उत्तम व निरोगी रहावे यासाठी शासनाने आरोग्य विभागावर जबाबदारी सोपविली आहे. मात्र या विभागाकडून तशी कार्यवाही होताना दिसून येत नाही.जेष्ठ नागरिकांच्या संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था मधील इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यात यावी. आयकर करात, प्रवासात देण्यात येणाऱ्या सवलती प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था कडून आकारण्यात येणाऱ्या करामध्ये सुद्धा सवलत मिळावी.
पोलिसांनी ज्येष्ठांच्या सुरक्षिततेकडे पहावे. वृद्धांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा.जेष्ठांचा शिक्षण संस्था व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधावा. राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात जेष्ठांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करावे. वृद्धांसाठी असणाऱ्या विविध योजना एकाच छताखाली आणून त्या योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावा, जेष्ठांचे दावे निकालात काढावे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर शिग्र कार्यवाही व्हावी. तसेच सक्षम ज्येष्ठ नागरिकांना अर्धवेळ नोक-या मिळवून देण्यासाठी मदत करावी. ज्येष्ठ नागरिकांचे बचत गट स्थापन करावे. अगरबत्ती,मेनबत्ती, पापड यासारखे लघुद्योगाचे काम ज्येष्ठांना देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.