Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुदत संपल्यानंतरही देवली वाघवणेत वाळूचा उपसा ; महसुलची डोळेझाक... ग्रामस्थांच्या...

मुदत संपल्यानंतरही देवली वाघवणेत वाळूचा उपसा ; महसुलची डोळेझाक… ग्रामस्थांच्या दोन गटात मारहाणीची घटना ; सात जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल…

मालवण, ता. ४ : देवली वाघवणे परिसरात वाळू उत्खननाची मुदत संपली असतानाही गेले काही दिवस वाळू माफियांकडून अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे. अवैध वाळू उपसा होत असतानाही महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी करत तीव्र संताप व्यक्त केला. तारकर्ली पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याने पूल धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुलासह खार बंधाऱ्यास धोका पोचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने कडक पावले उचलत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अनधिकृत वाळू उपशाविरोधात तक्रारी केल्याने देवली मळावाडी व नवागरवाडी येथील ग्रामस्थांमध्ये मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी मालवण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सात जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
वाळू उपसा करण्याची मुदत ३० जूनला संपल्यानंतर गेले चार पाच दिवस तारकर्ली पूलानजीकच्या खाडीपात्रात वाळू माफियांकडून वाळूचा उपसा केला जात आहे. अवैध वाळू उपशाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी महसूल व खनिकर्म विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी खाडीपात्रात उतरत वाळू उपसा करणार्‍या कामगारांचा पाठलाग केला. ग्रामस्थ आपल्या दिशेने येत असल्याचे दिसताच भय्या कामगारांनी तेथून पोबारा केला. चार ते पाच होड्यांद्वारे खुलेआम वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
देवलीत अवैधरीत्या उपसा केलेल्या वाळूच्या वाहतूकीसाठी विविध ठिकाणचे डंपरही तेथे होते. अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने महसूल विभागाचे भरारी पथक आहे कुठे असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला. तारकर्ली पुलाच्या दोन्ही बाजूने ६०० मीटरच्या पट्ट्यात वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही वाळू माफियांकडून तेथे वाळूचा उपसा सुरू आहे. परिणामी पुलास तसेच खारबंधार्‍यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या अनधिकृत वाळू उपसा करणार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
देवली वाघवणे खाडीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी याविरोधात प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे संतप्त वाळू माफिया व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की व मारहाणीची घटना घडली. यात वीरेश मांजरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अतुल सुरेशचंद्र चव्हाण, आनंद सुरेशचंद्र चव्हाण, गणेश उदय चव्हाण तिन्ही रा. देवली नवागरवाडी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वीरेश रावजी मांजरेकर, रमेश नाईक, रावजी धनाजी मांजरेकर, सत्यवान गंगाधर चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष शिवगण अधिक तपास करत आहेत.
देवलीत वाद वाढल्याची माहिती मिळताच महसूल व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जात पाहणी केली. यासंदर्भात तहसीलदार अजय पाटणे यांच्याशी संपर्क साधला असता देवली खाडीपात्रात महसूलच्या अधिकार्‍यांना वाळू उपसा करणारी एकही होडी आढळली नाही. तेथे केवळ वाळू साठा दिसून आला. हा वाळू साठा उचलण्यासाठी ६ जुलैपर्यंतची मुदत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments