भाऊसाहेब फुंडकर योजनेला ठिबक सिंचनाची अट रद्द

180
2

नुसत्या फळझाड लागवडीचा लाभ घेता येणार

सिंधुदुर्गनगरी ता.०४
२०१९-२० या वर्षांत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ठिबक सिंचना शिवाय राबवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पूर्वी या योजनेत ठिबक सिंचन बंधनकारक केली होती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त ७६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले होते. चालू वर्षासाठी जिल्ह्याला ८०० हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट दिले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधीक्षक विभागाने केले आहे.
कोकण विभागासाठी किमान १० गुंठे व कमाल १० हेक्टर क्षेत्रापर्यत लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ सर्व अल्प, अत्यल्प व मोठे शेतकरी घेवू शकतात. या योजनेत जमिन तयार करणे, माती व शेणखत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खत वापरून खड्डे भरणे यासाठीचा सर्व खर्च स्वत शेतक-यांनी करणे आवश्यक आहे. खड्डे खोदणे, कलमा रोपांची लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे यासाठी शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. या योजनेत एकूण तीन वर्षाच्या कालावधीत मंजूर मापदंडाच्या ५०:३०:२० या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी ९० टक्के टक्के जगणे आवश्यक आहे. योजनेत आंबा, नारळ, कोकम, आवळा या फळपिकांचा समावेश आहे. ठिबक सिंचनासह ४९ हजार ९१२ रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये लागवड क्षेत्रावर ठिबक सिंचनाची अट यावर्षी पासून कोकण विभागासाठी शिथील करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे शेतकरी ठिबक सिंचन करू शकणार नाहीत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असून ठिबक सिंचन साठीचे अनुदान वजा करून उर्वरित साठीचे अनुदान दिले जाणार आहे. यावर्षी ८०० हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट देण्यात आले असून यासाठी ३० जुलै पर्यंत अर्ज करावेत. तसेच लागवडीस इच्छुक शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
4