वेंगुर्ले-आसोलीत बीएसएनएलचा खेळखंडोबा सुरूच

179
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांमधून नाराजी;सेवा सुरळीत न केल्यास आंदोलन…

वेंगुर्ले /शुभम धुरी, ता.०४ : तालुक्यातील आसोली गावात बीएसएनएलचा खेळखंडोबा कायम राहिला आहे. गेले काही दिवस बीएसएनएलची रेंज पूर्णपणे गायब झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल,असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
याबाबतची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश नाईक,भूषण धुरी,नारायण घाडी यांनी दिली आहे. आसोली गाव दुर्गम भागात येत असल्यामुळे येथे बीएसएनएल शिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही, तर दुसरीकडे बीएसएनएलची रेंजच गायब होत असल्यामुळे येथील नागरिकावर मोबाईल बंद करून ठेवण्याची वेळ आली आहे.
भर पावसाळ्यात ही समस्या उद्धवू लागल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.तर तात्काळ एखाद्याला वैद्यकीय सेवा हवी असल्यास अथवा घटनेची माहिती देण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी संपर्क साधायचा असल्यास गावापासून चार ते पाच किलोमीटर दूर यावे लागत आहे.त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

\