पिंगुळीतील धुरी कुटुंबीयांवरील अ‍ॅट्रासिटीची कलमे वगळावीत… मालवण सकल मराठा समाजाच्यावतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन…

265
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ४ : पंधरा दिवसापूर्वी पिंगुळी-कुडाळ येथील धुरी कुटुंबीयांच्या घरात घुसून त्यांनाच मारहाण करीत त्यांच्यावरच कुडाळ पोलिस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याबाबत तक्रार नोंदविणार्‍या पिंगुळकर नामक व्यक्तीने केलेली तक्रार खोडसाळ आहे. त्यामुळे धुरी कुटुंबीयांवरील अ‍ॅट्रासिटीची कलमे वगळावीत या मागणीचे निवेदन मालवण तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आज पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना सादर करण्यात आले.
पिंगुळी येथे १६ जूनला धुरी यांच्याकडे एक पाहुणा आला होता. पाहुणा म्हणून आलेल्या मुलाचा आणि पिंगुळकर नामक व्यक्तीचा किरकोळ अपघातावरून वाद झाला. या वादात धुरी यांच्याकडे आलेल्या पाहुण्या मुलाने माफीही मागितली होती. त्यानंतर या विषयावर पडदा पडला. मात्र, काही काळाने पिंगुळकर ही व्यक्ती धुरी यांच्या घरात घुसून धुरी व त्या पाहुण्या मुलास त्याने मारहाण केली. या मारहाणीनंतर पिंगुळकर नामक व्यक्तीने पोलिस ठाण्यात धुरी कुटुंबीयांच्या विरोधात जातिवाचक तक्रार दाखल केली.
पिंगुळकर यांनी केलेली तक्रार ही खोडसाळ असल्याचा दावा करत तालुका सकल मराठा समाजाने मराठा समाजाचे नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले.
यावेळी सकल मराठा समाजाचे बाबा परब, सुधीर धुरी, उदय मोरे, विष्णू लाड, प्रताप बागवे, राजन गावडे, विनायक परब, वसंत धुरी, आबाजी राणे, भरत काळसेकर, रमेश हडकर, दिलीप गावडे, जयंद्रथ परब, सुभाष लाड, बिजेंद्र गावडे, प्रवीण बागवे, संतोष गावडे, सुमीत सावंत, अमित ढोलम, संतोष धुरी, नारायण लुडबे, अशोक बिरमोळे, मयूर गावडे, प्रथमेश घाडी, डॉ. सावंत आदी उपस्थित होते.

\