येत्या दोन दिवसात सर्व मार्गावरील वाहतूक सुरू होईल : नरेंद्र बोधे…
मालवण, ता. ४ : दुरुस्तीअभावी रखडलेल्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलावरून एसटी बसफेरीचा नव्याने शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान या मार्गावरील एसटी फेर्यांचे नव्याने वेळापत्रक तयार करून येत्या दोन दिवसात सर्व मार्गावरील एसटी वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी स्पष्ट केले.
कोळंब पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वीच पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस योग्य आहे का याची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर आज मालवण दौर्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्यासह पुलाची पाहणी केली. आजपासून एसटी बस वाहतूक सुरू करण्यात येईल का याची माहिती घेतली. त्यानुसार सायंकाळी मालवण कांदळगाव मसुरे मार्गे पोईप ही बसफेरी पुलावरून सोडण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बसफेरीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, सन्मेश परब, यशवंत गावकर, किरण वाळके, स्वप्नील आचरेकर, दीपा शिंदे, अंजना सामंत, विजय नेमळेकर, पराग खोत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोळंब पूल नादुरुस्त बनल्याने गेली दोन ते तीन वर्षे या मार्गावरून एसटी बस वाहतूक पूर्णतः बंद होती. आता पूल दुरुस्ती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाहतूक योग्य अहवालानंतर पुलावरून एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात या मार्गावरील एसटी बस फेर्यांचे नवे वेळापत्रक निश्चित करून पूर्ववत वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे श्री. बोधे यांनी सांगितले.