लोकप्रतिनिधींना योजनांची माहिती मिळण्यासाठी पत्रिका काढणार
आंबोली, ता.०५: सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू, जागाही निश्चित करू असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली जाईल. तश्या प्रकारचे आदेश देणारी पत्रिका काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा आज येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी आंबोली दौऱ्यावर असलेल्या श्री केसरकर यांनी या सभेला भेट दिली. यावेळी सभापती पंकज पेडणेकर व उपसभापती संदीप नेमळेकर सरपंच लीना राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बाबू सावंत यांनी श्री केसरकर यांनी जिल्ह्यात राबविलेल्या चांदा ते बांदा या योजनेचे स्वागत केले. अशा प्रकारची योजना खरोखरच उत्तम आहे मात्र ती तळागाळात राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या अशी मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना श्री केसरकर यांनी पत्रिका काढण्याबाबत आश्वासन दिले. तसेच पंचायत समितीचा प्रश्न पंधरा दिवसात सोडवू असे सांगितले.