आंबोली-गेळेतील जमिनींचे वीस दिवसात वाटप

2

ग्रामस्थांना वाटा ठरविण्याचा अधिकार : पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी, ता. ०५ : आंबोली-गेळे कबुलायतदार गावकार प्रश्न येत्या वीस ते बावीस दिवसात सुटणार आहे. सर्व गावकर्‍यांना वाटून जमिनी देण्यात येणार आहेत. कोणी किती जमिनी घ्यायच्या याचे अधिकार स्थानिक ग्रामस्थांना देण्यात आले आहेत. चौकुळचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्याबाबत लोकांकडून प्रतिसाद आल्यानंतर पुढील भूमिका घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आंबोली येथे आयोजित बैठकित आज दिली.
आंबोली-गेळे येथील जमिन वाटपासंदर्भात येथील हॉटेल ग्रीन व्हॅलीमध्ये आज ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, वनविभागाचे दिगंबर जाधव, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, गावचे प्रमुख शशी गावडे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकिची माहिती श्री. केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, जमिन वाटपासंदर्भात येत्या वीस दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी चार ते पाच दिवसात ग्रामस्थांनी कोणी किती जमिनी घ्याव्यात याचा निर्णय घ्यावा. त्यांना वनसदृष्य जमिनीत विक्रीची परवानगी देण्यात येऊ शकते का याबाबत विचार सुरू आहे. 1958 मध्ये झालेल्या सर्व्हेत पूर्वीची कुटुंबे 654 होती आता ती संख्या 1402 इतकी झाली आहे. त्यामुळे स्मशान, पर्यटनासाठी राखीव आणि खासगी वने आदी क्षेत्र सोडून बाकीची जमिन वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येकाला तूर्तासतरी 1 एकर जमिन मिळेल असा विश्वास आहे. काही ठिकाणच्या जमिनी राखीव म्हणून ठेवण्यात येणार होत्या. परंतू सर्व कुटुंबाना त्याचा लाभ मिळावा यासाठी आंबोलीत असलेल्या मेनन अ‍ॅण्ड मेनन कंपनीच्या सव्वा दोनशे एकर जमिनीत आरक्षण टाकण्यात येणार आहे. त्या ठिकाणी गोल्फ कोर्स आणि कन्व्हॅशन सेंटर या प्रकल्पांसाठी त्यांना जमिनी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रकल्प उभारण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यांनी नकार दिल्यास अन्य लोकांचा विचार करण्यात येईल.

2

4