नितेश राणेंनी केलेले आंदोलन योग्यच : बबन साळगावकर

2

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता टीका

सावंतवाडी, ता. ०५ : जिल्ह्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी मतांसाठी जिल्ह्यातील प्रश्नावर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अधिकारी गेंड्याच्या कातळीचे झाले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या प्रश्नासाठी आमदार नितेश राणे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही योग्यच आहे. त्याचे आपण जाहीर समर्थन करतो अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.
नारायण राणे यांनी चुकीच्या ठिकाणी माफी मागितली. अशा प्रश्नात त्यांना माफी मागण्याची गरज नव्हती. कणकवलीत घडलेला प्रकार आता सावंतवाडीतसुद्धी घडू शकतो असा इशारा श्री. साळगावकर यांनी दिला.
श्री. साळगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी जो प्रकार केला तो चुकीचा नाही. जनतेचा उद्रेक लक्षात घेता त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. ज्यांची जबाबदारी होती त्यांनी मतांच्या राजकारणासाठी जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे बनले आहेत. जिल्ह्यातील जनता वार्‍यावर सोडण्यात आलेली आहे. कुठच्याही खात्यातील मंत्र्यांनी यावे आणि येथील डॉ. स्वार यांच्या दवाखान्यासमोर उभे राहून दाखवावे. नेमकी चिखलाची आंघोळ कशी असते हे त्यांना पहावयास मिळेल. नारायण राणेंनी माफी मागण्याची घेतलेली भूमिका योग्य नाही. त्यांनी चुकीच्या ठिकाणी माफी मागितली आहे. नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. मी हे बोलतोय म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जातो असे कोणी म्हणेल तर ते संयुक्तीक ठरणार नाही. लोकांचा प्रश्न आहे. लोकांच्या प्रश्नासाठी मी कधीही आंदोलन करायला तयार आहे.

2

4