बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली शेडेकर कुटुंबीयांची भेट

2

कणकवली, ता. ०५ : कणकवली गडनदी पुलावर स्वाभिमान कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. त्यानंतर राज्यातील बांधकाम अभियंत्यांनी अघोषित बंद पुकारला होता. तर शेडेकर कुटुंबीय या घटनेनंतर मानसिक तणावाखाली होते. या पार्श्वभूमिवर राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील शेडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
उपअभियंता शेडेकर यांच्यावर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने चिखलफेक केली ती निषेधार्ह घटना असल्याचे श्री.पाटील यांनी सांगत प्रकाश शेडेकर यांचे काका, आई, पत्नी यांना धीर दिला. या घटनेबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी ना चंद्रकांत पाटील यांना दिली. तसेच अभियंत्यांच्या असहकार आंदोलनाबाबतची माहिती दिली होती.

नागरिकांनी सहकार्य करावे – ना. चंद्रकांत पाटील
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून आमचे सरकार काम करत आहे. कोकणवासियांची गेले कित्येक वर्षांपासून असलेली महामार्गाची मागणी आमचे सरकार पूर्ण करत आहे. कणकवलीत उड्डाणपूल बॉक्ससेलमध्ये होणार होते. मात्र नागरिकांच्या मागणीनंतर ते वाय आकाराचे ब्रीजला मंजूर देण्यात आली. त्यामुळे उशिराने कामाला सुरवात झाली. काम करताना काही त्रुटी असू शकतील. त्यामुळे नागरिकांनी काही महिन्यांसाठी संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

0

4