दरवर्षी २०० मुले होत आहेत कमी : प. स. सभेत माहिती उघड
वेंगुर्ले, ता.५ : आपल्या मराठी शाळा म्हणजेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरु रहाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. वेंगुर्ले तालुक्यातील दोन प्राथमिक शाळा पटसंख्ये अभावी यावर्षी बंद कराव्या लागल्या आहेत. तसेच तालुक्यातील प्राथमिक शाळेतील २०० मुले दरवर्षी कमी होत आहेत. हि गंभीर बाब असून यावर चर्चा करुन याबाबत ठोस उपाय योजना करण्याचा निर्णय आजच्या मासिक सभेत घेण्यात आला.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनिल मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती स्मिता दामले, पं. स. सदस्य यशवंत परब, सिध्देश परब, मंगेश कामत, श्यामसुंदर पेडणेकर, गौरवी मडवळ, साक्षी कुबल, अनुश्री कांबळी, प्रणाली बंगे, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस चिपळुण येथील तीवरे धरण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहाण्यात आली. तसेच कणकवली येथे स्वाभिमान पक्षाच्या कार्यकत्यांकडुन उपअभियंता प्रकाश शेडेकर याच्यावर चिखल ओतण्याचा व त्यांना पूलावर बांधून ठेवण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. त्याच प्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील हायस्कुल मधुन दहावीतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्याचा व शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळविलेल्या विद्याथ्याच्या अभिनंदना ठराव करण्यात आला.
दरम्यान आजची सभा ग्रा. पं. विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर आणि पंचायत समिती सदस्या अनुश्री कांबळी व साक्षी कुबल यांच्यात उडालेल्या खडाजंगीमुळे वादळी ठरली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता केरवडेकर यांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने वाद वाढला. दरम्यान सभापती सुनिल मोरजकर यांनी हस्तक्षेप करत, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही उत्तरे द्या. तुम्ही उलट प्रश्न उपस्थित करू नका असे सांगून त्यांना खाली बसविले. तसेच यापुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सभागृहाची शिस्त पाळून लोकप्रतिनिधींशी बोलावे अशी सक्त सुचना केली. साक्षी कुबल यानी प. स. चे अधिकारी चुकीचे ठराव, सुचना लिहुन घेत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. भंडारवाडी येथे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावा अशी सुचना आपण मागील सभेत मांडली असताना मंजुर झाला असे लिहून घेण्यात आले त्यामुळे वारंवार सांगूनही संबंधित अधिकारी बेजबाबदार पणे वागत असल्याचे सांगितले. यावर यापुढे सदस्यानी आपले ठराव, सुचना लेखी द्याव्यात असे सुचविण्यात आले. मात्र यापुर्वी लेखी सुचना व ठराव देवूनहि चुका झाल्याचे अनुश्री कांबळी यानी निर्दक्षनास आणुन दिल्या. आम्ही लेखी सुचना, किंवा ठराव देणार नाहि. तुम्हाला पाहिजे असल्यास रेकॉडिग करा असे सांगितले.