सावंतवाडी, दोडामार्गसाठी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल
सावंतवाडी, ता. ०५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गनगरीतच होणार आहे. सावंतवाडी व दोडामार्गसाठी वेगळ्या मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटलची उभारणी करण्यात येणार आहे. मी सावंतवाडीचा नाही तर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे कोणी सह्यांची मोहिम राबविली याला महत्व नाही, अशी भूमिका पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे मांडली.
येणार्या महिन्याभरात जिल्ह्यातील 2 हजार युवकांना रोजगार देण्यात येणार आहे. तसेच चांदा ते बांदा योजनेतून विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील लोकांना समृद्ध करण्यात येणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहात विविध खात्याच्या खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी उपस्थित पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, राजन पोकळे, अशोक दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, लोकांच्या आरोग्याची मला जाणीव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना मध्यभागी ठरावे म्हणून सिंधुदुर्गनगरीची जागा व शासकीय हॉस्पीटल निवडण्यात आले. सद्यस्थितीत ते 200 खाटांचे आहे. पहिल्या वर्षाची परवानगी मिळण्यासाठी तेवढ्या क्षमतेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणीही काही मागणी करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण मागणी करावी. मी सावंतवाडीचाच नाही तर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील जागा ठरविली आहे. केंद्राकडूनही त्याला हिरवा कंदिल दिला आहे. कोणी आता प्रयत्न करत असल्याचे दाखवत असेल, पण चार वर्षापूर्वी मी याच्यासाठी पाठपुरावा केला आहे ही वस्तुस्थिती आहे. सावंतवाडी व दोडामार्गमध्ये होणार्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलमध्ये कॅन्सर व हृदयविकार आदीवर उपचार होणार आहेत.