दीपक केसरकर : साळगावकर माझे मित्र, पण त्यांनी बोलताना तारतम्य पाळावे
सावंतवाडी, ता. ०५ : नितेश राणे हे राजकारणात लहान आहेत. त्यांना भविष्यात संधी आहे. त्यामुळे त्यांना अटक करताना मला आनंद झाला नाही. परंतू त्यांच्याकडून झालेला प्रकार चुकीचा आहे. त्यामुळेच आपण कठोर भूमिका घेतली अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान नगराध्यक्ष बबन साळगावकर हे माझ्या जवळचे मित्र आहेत. ते माझ्या हृदयात आहेत. त्यांना काही खटकत असल्यास त्यांनी मला सांगावे. ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अशा लोकांची त्यांनी भलावण करू नये असाही टोला केसरकर यांनी लगावला.
कणकवली येथे घडलेल्या चिखलफेक प्रकरणाचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी समर्थन केले होते व असा प्रकार सावंतवाडीत घडेल असे म्हटले होते. दरम्यान या पत्रकार परिषदेला काही अवधी उलटतो न उलटतोच की केसरकर यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, सावंतवाडी पालिकेला संस्थानाचा इतिहास आहे. त्या नगराध्यक्षाच्या गादीवर मी सुद्धा बसलो होतो. त्यामुळे या गादीवर बसून कोणतेही वक्तव्य करताना साळगावकर यांनी तारतंम्य बाळगणे गरजेचे होते.
ते पुढे म्हणाले, साळगावकर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. एखादी गोष्ट खटकली तर त्यांनी मला थेट सांगणे गरजेचे होते. ते माझ्या हृदयात आहेत. मात्र चुकीच्या प्रकाराचे समर्थन करणे योग्य नाही. ते ज्यांचे समर्थन करीत आहेत त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. मी गृहमंत्री असल्यामुळे त्यांची जंत्रीच माझ्याकडे आहे. त्यामुळे साळगावकर यांनी त्यांचे समर्थन करणे चुकीचे आहे.