कासार्डे येथे भंगार व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला | हल्लेखोरास ग्रामस्थांनी पकडले

2

कणकवली, ता. ०५ : भंगार साहित्य घेण्यास नकार दिल्याच्या कारणातून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार आज घडला. तालुक्यातील कासार्डे बाजारपेठ येथे सकाळी आठ वाजता ही घटना घडली. यातील हल्लेखोर आरोपी प्रवीण धोंडू वरक याला ग्रामस्थांनी पकडले. या प्रकरणी नंदू दाजी गोसावी (वय 49, रा.कासार्डे, बंडवाडी) यांनी आज पोलिसांत तक्रार दाखल केली.
भंगार व्यावसायिक नंदू गोसावी यांच्या घरालगतच्या भंगार गोडाऊन मध्ये सकाळी साडे सातच्या सुमारास लोखंडी पट्ट्या घेऊन एक व्यक्ती आली होती. तसेच या पट्ट्या विकत घ्या असा तगादा त्याने लावला होता. गोसावी यांना याबाबत संशय आल्याने त्याने लोखंडी पट्ट्या घेण्यास नकार दिला. तसेच त्या व्यक्तीला तेथून हाकलून लावले. सकाळी आठच्या सुमारास गोसावी आपल्या दुचाकीवरून कासार्डे बाजारपेठेमध्ये आले असता सकाळी भंगार घेऊन आलेला व्यक्ती हातात कोयता घेऊन आला. तसेच त्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोसावी हे खाली वाकले. तरीही कोयता डोक्याला लागला. यानंतर हल्लेखोर पसार झाला. तर गोसावी उपचारासाठी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. यानंतर तेथील ग्रामस्थांनी पाठलाग करून हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासाअंती प्रवीण धोंडू वरक असे त्याचे नाव असल्याचे लक्षात आले. याघटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

21

4