आडवलीतील युवकाचा काविळीच्या आजाराने मृत्यू…

282
2

मालवण, ता. ५ : आडवली बौद्धवाडी येथील विनोद दत्ताराम कदम (वय- २८) या युवकाचा काविळीच्या आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनोद कदम याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आडवली येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कणकवली येथे झाले. विनोद हा गेले काही दिवस काविळीच्या आजाराने त्रस्त होता. त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, चार भाऊ, दोन बहिणी, भावोजी, काका, काकी असा परिवार आहे.
आडवली येथील प्रसिद्ध स्वरगंध कलामंचचा विनोद हा प्रमुख होता. त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर सामाजिक बांधिलकी जोपासणारे व समाज प्रबोधनात्मक लघुपटांची निर्मिती केली आहे. गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात तो हिरिरीने सहभागी होत असे. सामाजिक कामाचीही त्याला आवड होती. विनोद याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आडवली येथील कालकथीत दत्ताराम ऊर्फ भाऊ कदम यांचा तो मुलगा होय.

4