२० घरांना धोका ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण…
मालवण, ता. ५ – समुद्राच्या अजस्र लाटांच्या तडाख्यात नादुरुस्त बनलेला देवबाग येथील बंधारा आज समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. ख्रिश्चनवाडीतील बंधार्याचा बराचसा भाग वाहून गेल्याने समुद्री लाटा थेट वस्तीत घुसत आहेत. परिणामी तेथील घरांना धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लाटांच्या तडाख्यात दोन शौचालये कोसळली. विद्युत खांबांनाही धोका निर्माण झाला आहे. आज सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर व महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
दोन आठवड्यापूर्वी वादळी वारा, मुसळधार पाऊस व वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्यात देवबाग किनारपट्टीवरील जीर्ण झालेला बंधारा अनेक ठिकाणी नादुरुस्त बनला होता. शासनाच्यावतीने केवळ उपाययोजना करण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. १९९३ ते १९९५ या दरम्यान बांधलेला बंधारा ख्रिश्चनवाडी भागात अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी थेट वस्तीत घुसत आहेत. विद्युत खांब वाकले असून धोकादायक बनले आहेत. येत्या काळात आषाढी एकादशी व पौर्णिमेचे उधाण असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बंधारा वाहून गेल्याची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मंडळ अधिकारी आर. व्ही. निपाणीकर, वायरी तलाठी रवींद्र तारी, पोलिस पाटील भानुदास येरागी, ग्रामपंचायत सदस्य पिंकू फर्नांडिस, शाखाप्रमुख रमेश कद्रेकर, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर, मकरंद चोपडेकर, तमास फर्नांडिस, नादार तुळसकर यांनी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.
लाटांच्या मार्यात ख्रिश्चनवाडी येथील बावतीस फर्नांडिस व सोज यांची दोन शौचालये वाहून गेली. यात सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले आहे. याचा पंचनामा महसूल प्रशासनाकडून करण्यात आला. देवबाग ख्रिश्चनवाडी वेलांकणी ते बाबा सामंत यांच्या घरापर्यंत बंधारा वाहून गेला आहे. किनारपट्टीवरील २० पेक्षा अधिक घरांना धोका आहे. काही घरांच्या भिंतीवर पाणी धडकत आहे. लाटांचा जोर सातत्याने सुरूच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शासनाने याठिकाणी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.