बावखोल- धामापूर रस्त्याचे काम निकृष्ट… दर्जेदार काम न झाल्यास चौके ग्रामस्थ आंदोलन छेडतील ; सरपंच राजा गावडे यांचा इशारा…

2

मालवण, ता. ५ : चौके ग्रामपंचायत हद्दीतील मालवण- कुडाळ मुख्य रस्ता ते बावखोल मार्गे धामापूर रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मे महिन्यात पूर्ण करण्यात आले. मात्र या कामाला महिनाही पूर्ण झाला नसताना या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी पादचारी, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे घाईगडबडीत केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी केला आहे. जोपर्यंत दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत संबंधित कंत्राटदारास बिल अदा करू नये अन्यथा चौके ग्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा श्री. गावडे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
याबाबतचे निवेदन श्री. गावडे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या मालवण- कुडाळ मुख्य रस्ता ते बावखोल मार्गे धामापुर रस्त्याचे काम मे महिन्यात पूर्ण झाल्यानंतर पावसात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. हे काम भौतिक स्वरूपात पूर्ण झाले असले तरी या कामाची रक्कम संबंधित ठेकेदारास देऊ नये. रस्त्याची अवस्था निकृष्ट दर्जाची असताना कार्यालयाकडून ठेकेदारास कामाची रक्कम दिल्यास चौके ग्रामस्थ कार्यालयासमोर आंदोलन छेडतील. तरी या रस्त्याचे काम जोपर्यंत चांगल्या दर्जाचे होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारास बिल न देण्याची मागणी सरपंच गावडे यांनी केली आहे.

15

4