आंबेगाव येथील घटना: शिवसेना आक्रमक,पोलिसांविरोधात नाराजी
सावंतवाडी,ता.०६: दारू विक्रीची टीप दिल्याच्या रागातून आंबेगाव येथे दोघा ग्रामस्थांना दारू व्यवसायिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार काल रात्री घडला दरम्यान यात दोघे जण जखमी झाले आहे. नामदेव नाईक व महेश जाधव अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार पोलिसांनी मिटविण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेच्या तालुका संघटक अपर्णा कोठावळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती त्यांनी दिली त्या म्हणाल्या आंबेगाव येथे गेली अनेक वर्षे बेकायदा दारू विक्री सुरू आहे. त्यात तब्बल १५ हून लोक आजपर्यंत दगावले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी गेले काही दिवस ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान काळ त्या ठिकाणी येणाऱ्या दारूच्या साठ्याची माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. तसा नियोजित छापा टाकण्याचे प्लॅनिंग होते त्यानुसार पोलिसांना बोलावले. परंतु छापा टाकल्यानंतर त्या दारू व्यवसायिकातील काहींनी या दोघांना सळईच्या साह्याने मारहाण केली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या पुढ्यात घडला. याबाबत तक्रार घेण्यास पोलिसांनी उशिरा पर्यंत टाळाटाळ केली. त्यामुळे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात गेले. यात जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, प्रशांत कोठावळे आदींचा समावेश होता. त्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले. परंतु त्यातही पोलिसांकडून सहकार्य झाले नाही. त्यामुळे आता प्रसंगी आंदोलन करू असा इशारा सौ. कोठावळे यांनी दिला आहे.