जयेंद्र परूळेकर:चिखलफेकीचे नाही आंदोलनाचे समर्थन
सावंतवाडी, ता. ०६ : लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेल्या आमदाराला जेल मध्ये टाकणे हा लोकशाहीचा गळा घोटण्या सारखा प्रकार आहे. शिवसेना-भाजपा युती कडून हा प्रकार सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
आपण नितेश राणेंनी केलेल्या चिखल फेकीचे समर्थन करणार नाही परंतु त्यांचे आंदोलन बरोबर होते. लोकांच्या मागण्या लक्षात घेता महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे होते परंतु दुर्दैवाने अधिकार्यांच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही .त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने राणे यांनी आंदोलन केल्यास वावगे नाही त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा करण्यासारखे गुन्हे दाखल करून शासनाने काय साध्य केले असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. एका आमदाराला जेलमध्ये टाकले म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासारखा आहे त्यामुळे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून लोकांनी आता सजग राहणे गरजेचे आहे. त्यांनी यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणारे केसरकर आता का गप्प राहिले? ते नेमकी अपघात होण्याची वाट बघत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येणाऱ्या काळात केवळ मतांवर डोळा ठेवून करोडो रुपये आणल्याचे केसरकर सांगत आहेत. मात्र एक रुपया सुद्धा या ठिकाणी खर्च झालेला नाही, लोकांना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे असे परुळेकर म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होईल त्या ठिकाणी होईल असे रोज बनवाबनवी करणाऱ्या केसरकरांना नेमके हॉस्पिटल म्हणजे काय हे माहित आहे? का असाही खोचक सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.