मुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या सन्मानामुळे प्रत्येक बुथ निहाय कार्यक्रम
वेंगुर्ले, ता. ६ : भाजपाच्या महिला मोर्च्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षापर्व’ कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येक बुथ निहाय महिलांकडून सुमारे २५ हजार राख्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या जाणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहा कुबल यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षाच्या सत्ता कालावधीत महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून सन्मान दिला. मातृवंदना, जनधन, शौचालय, उज्वला गॅस, बेटी बचाव, बेटी पढाव आदी योजना तळागाळापर्यत पोहचवून महिलांना त्याचा लाभ मिळवून दिला. एक आपली घरची भावाप्रमाणे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रेमाचे बंधन म्हणून राखी बांधण्याचा तसेच यापुढेहि महिलांना या मुख्यमंत्र्यांनी सन्मान द्यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३ ते १० ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक बुथ निहाय किमान २५ राख्यांचे संकलन करून या सर्व राख्या १० ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना बांधल्या जाणार आहेत.
या उपक्रमाचे नियोजन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या महिला मोर्च्याच्या माध्यमातून बुथ निहाय करण्यात आलेले आहे. या सर्व राख्या संकलीत करण्याची जबाबदारी सिंधुदूर्गातील विधानसभा संयोजक स्मिता आठलेकर (सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले), उषा आठले व रश्मी लुडबे (मालवण-कुडाळ), प्रज्ञा धवण (कणकवली-देवगड) यांचेकडे असून मुख्य संयोजक सिंधुदूर्ग जिल्हा महिला अध्यक्षा सौ. स्नेहा कुबल यांनी आपल्यासह निश्चीत केली आहे. त्यानुसार मुंबई येथे होणाऱ्या महिला मेळाव्यात त्यांचेकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. भाजपाच्या महिला मोर्च्याच्या या रक्षापर्व’ उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बुथ निहाय महिलांनी उत्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहा कुबल यांनी केले आहे.