समित्यांतील वाद : स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत
आंबोली, ता. ०६ : येथे वाहणारा धबधबा आंबोली, चौकुळ की पारपोलीचा या विषयावरून गेली दोन वर्षे निर्माण झालेल्या वादाला आज वेगळेच वळण लागले. धबधब्यावर घेण्यात आलेला कर कोणी घ्यावा यावरून तीन्ही वनसमित्यांचे एकमत न झाल्यामुळे अखेर त्या ठिकाणी घेण्यात येणारा कर तुमच्यात एकमत होईपर्यत जमा करूच नये असा निर्णय आज घेण्यात आला. तत्पूर्वी काल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी धबधब्यावर घेतला जाणारा कर आकारण्याचे बंद करू असे सांगितले होते.
या निर्णयामुळे त्या ठिकाणी वर्षा पर्यटनाची मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याचा फायदा होणार आहे. परंतु या करापोटी संबंधित वन समितीला मिळणारे आठ ते दहा लाख रुपये आता बुडणार आहेत. या निर्णयाचे स्थानिक ग्रामस्थ व्यापारी व हॉटेल व्यावसायिक यांनी स्वागत केले आहे.
आंबोली येथे वाहणाऱ्या धबधब्याच्या मालकीवरून गेली दोन वर्षे वाद सुरू आहे. आंबोली येथील वन समितीने हा धबधबा आपला आहे असा दावा केला होता. गेली अनेक वर्षे आंबोली म्हणूनच हा धबधबा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणी कर रुपात मिळणारी रक्कम ही आपली असे त्यांचे म्हणणे होते, तर दुसरीकडे आंबोली धबधबा जरी असला तरी त्या ठिकाणी जाणारे पाणी हे चौकुळ मधून जाते असे चौकुळ समितीचे म्हणणे होते. तिसरीकडे पारपोली गावाच्या हद्दीत हा धबधबा असल्यामुळे त्या ठिकाणी मिळणाऱ्या कर हा पारपोली वनसमितीकडे राहावा असे त्यांचे म्हणणे होते. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी आज येथील ग्रीन व्हॅली हॉटेलमध्ये तीनही वन समितीच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यावेळी करापोटी मिळणारी रक्कम तीनी वन समित्यांमध्ये वाटून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. परंतु पारपोली समितीने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आंबोली धबधब्यावर कर आकारणी बंद करावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव पोलिस सहाय्यक निरिक्षक आण्णासो बाबर, हवालदार गुरू तेली, बाबू तेली, चौकुळ वन समिती अध्यक्ष पांडुरंग गावडे, आंबोली अध्यक्ष विद्यासागर गावडे, पारपोली अध्यक्ष व सरपंच गावकर, तुकाराम गावडे, मायकल डिसोझा, विशाल बांदेकर, गुलाबराव गावडे, संतोष पालेकर, संतोष शेटये, हेमंत नार्वेकर, मनीष नार्वेकर, अजित नार्वेकर तसेच आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते.