तिलारी-कोनाळकट्टातील मोबाईल टॉवर चालू न केल्यास दोडामार्ग कार्यालय बंद करू : राजेंद्र म्हापसेकर

2

दोडामार्ग, ता. ०६ : भारत संचार निगम लिमिटेड यांनी कोनाळकट्टा-तिलारी येथे उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर गेल्या दिड दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. भारत संचार निगम यांनी दोन दिवसात सेवा पूर्ववत केली नाही तर दोडामार्ग दूरध्वनी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी तसेच येथील ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांनी दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा तिलारी येथे काही वर्षांपूर्वी उभारलेला मोबाईल टॉवर गेल्या दिड दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरातील दूरध्वनी मोबाईल ग्राहकांची गैरसोय होत आहे. येथे महत्त्वाचे तिलारी धरण तसेच सरकारी कार्यालये आहेत. शिवाय बॅंक ऑफ इंडिया शाखा आहे. येथील मोबाईल टॉवर बंद असल्याने संपर्क साधला जात नाही. केवळ फोन करण्यासाठी सहा ते सात किलोमीटर अंतरावर साटेली भेडशी येथे यावे लागते. वेळोवेळी मागणी करुन देखील भारत संचार निगम लिमिटेड यांचे अधिकार याकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकांची हेतुपुरस्सर गैरसोय करत आहेत असे राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.
भारत संचार निगम यांनी सोमवार पर्यंत तिलारी कोनाळकट्टा येथील मोबाईल टॉवर सुरू केला नाही तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मोबाईल धारक ग्राहक यांना सोबत घेऊन दोडामार्ग येथिल भारत संचार निगम लिमिटेड यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी दिला आहे.

15

4