केंद्रीय अर्थसंकल्पात झिरो बजेट नैसर्गिक शेतीला प्राधान्य

127
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ब्रिगेडियर सुधीर सावंत : सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्गनगरी, ता. ०६ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कारकीर्दीतील या पहिल्या अर्थसंकल्पात ‘झिरो बजेट नैसर्गिक शेतीला’ मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधिर सावंत यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. ब्रिगे. सुधिर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान यासाठी महाराष्ट्रभर झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार गेली पाच वर्षे करत आहे. महाराष्ट्रात या विषयाची अनेक महाशिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम, कृषि प्रात्यक्षिके, शिवार फेर्‍या, प्रक्षेत्र भेटी, शेतकरी सहली, दत्तक गाव योजना, कृषि कार्यानुभव कार्यक्रम, चर्चासत्रे, व्हिडिओ शिबीरे आदी कार्यक्रमांद्वारे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार केला. आता या तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत.

‘झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा’ विषय केंद्रीय अर्थसंकल्पात घेण्यासाठी ब्रिगे. सुधीर सावंत गेली पाच वर्षे सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. यामुळे देशातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक शेती सहजीवन पद्धतीची असते. म्हणजेच एकाच जमिनीमध्ये ५ ते ६ प्रकारची एकाच पद्धतीने पिके लावता येतात व त्यामध्ये आंतरपिकांची लागवड करता येते. नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते व किटकनाशके यांचा वापर करण्यात येत नाही. या शेती पद्धतीने विषमुक्त अन्न तयार होते. त्यामुळे मानवाला होणारे महाभयंकर रोग उदा. कर्करोग, मधुमेह व हृदयविकार या पासून बचाव होतो.

नैसर्गिक शेती पद्धती म्हणजे जसे जंगलांची वाढ होते. जंगलातील झाडांना कोणी पाणी व खते देत नाही, तरीही त्यांची वाढ झपाट्याने होते. त्याच धरतीवर पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे शास्त्र बनविले. त्यासाठी त्यांना सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खता ऐवजी देशी गाईचे शेण व गोमूत्र यापासून बनविलेले जीवामृत, बीजामृत व घनजीवामृत मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतातीलच वनस्पतीपासून नैसर्गिकरीत्या बनविलेले अग्निअस्त्र, ब्रम्हास्त्र, निमास्त्र व दशपर्णी अर्क यांचा वापर होतो. हे सर्व घटक शेतकरी आपल्या शेतात तयार करतात. हवेमध्ये पाण्याचा समुद्र आहे. जंगलात दवाचे रूपांतर पाण्यात होऊन झाडांना नैसर्गिक पाणी मिळते. शेतात नैसर्गिक आच्छादन करून हवेतील पाणी शोषण्याची क्रिया होऊन जमिनीत पाणी मुरते व ते पिकांना मिळते. कृषि प्रतिष्ठान या विषयाची सतत प्रशिक्षणे घेत आहे. या संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्राचा संपुर्ण कृती आराखडा नैसर्गिक शेतीवर तयार करून तो भारतीय कृषि संशोधन परिषदेला गेली ३ वर्षे सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या प्रक्षेत्रावर रासायनिक खते व किटकनाशके वापरण्यास बंदी केली आहे. या शेतीचा प्रसार पूर्ण महाराष्ट्रात करून शेतीवरील खर्च कमी करण्यात येईल. आता सरकारने नुसते जाहिर केले आहे, पण याला पुर्ण आर्थिक पाठबळ व तयार होणार्‍या मालाला वेगळी विक्री व्यवस्था सरकारद्वारे करण्यात यावी यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.

माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या खास प्रयत्नातून केंद्रीय बजेट मध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेतीसाठी केलेल्या तरतुदीचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. कृषि प्रतिष्ठान व शेतकरी यांच्यामध्ये आज आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषि प्रतिष्ठानकडे येत असतात. आता हे तंत्रज्ञान देशभर पोहचविण्याचा संकल्प डॉ. सुभाष पाळेकर व ब्रिगे. सुधीर सावंत यांनी केला आहे. तसेच या मोहीमेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी भाग घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

\