कोळंब पुलाखालील भराव न काढल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा…

2

सा. बा. विभागाच्या कारवाईच्या नोटिशीस ठेकेदाराकडून केराची टोपली…

मालवण, ता. ६ : कोळंब पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असून एसटी वाहतूकही सुरू झाली. मात्र ठेकेदाराने पुलाखालील मातीचा भराव काढला नाही. भराव तसाच ठेवल्याने कोळंब, खैदा येथे वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ भराव न काढल्यास बुधवारी आंदोलन छेडले जाईल असा इशारा कोळंब, खैदा, कातवड येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांना दिला.
गेली तीन वर्षे दुरुस्ती रखडलेल्या कोळंब पुलाची दुरुस्ती पूर्ण होऊन एसटी वाहतूक सुरू झाली आहे. पुलाचे काम झाले तरी ठेकेदाराने पुलाखालील मातीचा भराव अद्याप काढलेला नाही. त्यामुळे कोळंब गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम, तहसील कार्यालय आणि पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी सरपंच प्रतिमा भोजने, संदीप भोजने, ग्रा.प. सदस्य संजय कांबळी, यशवंत चव्हाण, अनिल न्हिवेकर, माजी सरपंच सुनील मलये, नीलेश बागवे, अंकुश कणेरकर, पंकज धुरी, मंगेश चव्हाण, किशोर पवार, दीपक कोरगावकर, अर्जुन धुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांची भेट घेतली. कोळंब पूल पूर्ण होऊनही ठेकेदाराने खाडीतील गाळ काढला नाही. त्यामुळे कोळंब, खैदा येथील वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या अशा मस्तीमुळे कणकवलीत चिखलफेक प्रकरण घडले. अधिकाऱ्यांची अशीच मस्ती राहिल्यास मालवणातही असाच प्रकार घडू शकतो असा इशारा ग्रामस्थांनी दिला. गाळ काढण्याबाबत तहसीलकडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिल्याचे नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी सांगितले. तहसीलदारांच्या पत्राला जुमानत नसेल तर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून भराव काढण्याबाबत सूचना देऊ असे नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी स्पष्ट केले. बुधवारपर्यंत भराव न काढल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांचीही भेट घेऊन आंदोलनाचा इशारा देत त्यांनंतर होणाऱ्या परिणामांना बांधकाम विभाग जबाबदार राहील असे सांगितले.
कोळंब पुलाखालील मातीचा भराव न काढल्यास कोळंब गावात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाडीपात्रातील भराव काढण्यास दिरंगाई केल्यास अथवा कर्तव्यात कसूर केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन २००५ चे प्रकरण १० कलम ५६ नुसार कारवाई करणार असल्याची नोटीस तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण अध्यक्ष अजय पाटणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास काढली आहे.
कोळंब पुलाखालील मातीचा भराव न काढल्यास तहसीलदारांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला कारवाईची नोटीस काढली. मात्र, बांधकाम विभागाच्या नोटीसीला ठेकेदार कंपनीने कोणतेही उत्तर दिले नसल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या नोटीसीला ठेकेदाराने केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले.

4

4