दोघे जखमी ; एकाला जिल्हा रुग्णालयात हलविले
मालवण, ता. ६ : तालुक्यातील कर्लाचाव्हाळ आजगावकर बंगला येथे इनोव्हा कार व बजाज पल्सर यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील सुभाष पांडुरंग चव्हाण (४२), प्रशांत बाबुराव चव्हाण (४२) दोन्ही रा. नांदरुख घरटनवाडी हे जखमी झाले. यातील सुभाष चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ३ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.
नांदरुख येथील सुभाष चव्हाण व प्रशांत चव्हाण हे दोघे बजाज पल्सर गाडीवरुन भरधाव वेगाने मालवण येथुन नांदरुख येथे जात होते. मालवणच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारच्या चालकाने दुचाकीस्वार वेगात येत असल्याचे पाहुन गाडीचा वेग कमी केला. मात्र दुचाकीचा वेग नियंत्रणात न आल्याने दुचाकी इनोव्हा कारच्या आरशाच्या दिशेने धडकली. यावेळी दुचाकीवरील सुभाष चव्हाण, प्रशांत चव्हाण हे दोघे रस्त्यावर पडले. अपघात घडल्याचे दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. डॉ. शिवप्रसाद तेली व रुग्णवाहिकेचे चालक महेश वस्त यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉ. बालाजी पाटील यांनी जखमींवर उपचार केले. यात गंभीर जखमी झालेल्या सुभाष चव्हाण यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.
यावेळी चौके सरपंच राजा गावडे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, मोहन वराडकर यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपुस केली.