शिशिर परुळेकर यांना भाजप जिल्हाध्यक्षांची नोटीस…पक्षविरोधी भूमिकेचा खुलासा आठ दिवसांत करा

266
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.6 ः भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांना भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन देणे तसेच हायवे प्रश्‍नी पक्षविरोधात भूमिका जाहीरपणे मांडल्याबाबत आठ दिवसांत खुलासा करावा असे या नोटिशीत म्हटले आहे.

हायवे उपअभियंत्यांच्या कुटुंबीयांना तत्परतेने भेटणार्‍या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी कणकवली हायवेचीही पाहणी करावी अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती. तसेच हायवे खड्ड्यांच्या प्रश्‍नी काही राजकीय नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांना चुकीची माहिती दिली जात आहे. त्यांची दिशाभूल केली जात आहे. तसेच खड्यांची समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा जनमानसात डागाळत असल्याचे श्री.परुळेकर यांनी म्हटले होते.
श्री.परुळेकर यांच्या या जाहीर भूमिकेनंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्यांना तातडीची नोटीस बजावली आहे. पक्षाची भूमिका मांडण्याची कोणतीही जबाबदारी नसताना तसेच पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा न करता हायवे संदर्भात मांडलेली भूमिका ही पक्षविरोधी आहे. त्याबाबतचा लेखी खुलासा आठ दिवसांत करा असेही श्री.जठार यांनी नोटिशीत म्हटले आहे.