Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी मच्छीमार धोरण २०१९ ठरणार... समस्या जाणून घेण्यासाठी...

मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी मच्छीमार धोरण २०१९ ठरणार… समस्या जाणून घेण्यासाठी १३ जुलैला मालवणात चर्चासत्र ; बाबा मोंडकर यांची माहिती…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील मच्छीमार समाज गेली अनेक वर्षे अगणित समस्यांनी त्रस्त आहे. मच्छीमारांच्या दुर्लक्षित समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांनी पुढाकार घेतला आहे. मच्छीमार समाजाला न्याय देण्यासाठी मच्छीमार धोरण निश्‍चित केले जाणार आहे. या धोरणात मच्छीमार समाजातील दुर्लक्षित समस्यांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी हॉटेल महाराजा येथे १३ जुलैला सकाळी अकरा वाजता चर्चासत्र घेतले जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अवी सामंत, प्रदीप मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या चर्चासत्रात मच्छीमार समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहावे. पुढील काळात भाजपच्या माध्यमातून मच्छीमारांच्या समस्यांवर धोरणात्मक तोडगा काढला जाईल असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.
मच्छीमार समाजात केवळ मासेमारीची समस्या नसून प्रचंड समस्यांचा सामना समुद्र व नदी किनारपट्टीवरील मच्छीमारांना करावा लागत आहे. मच्छीमारांच्या समस्यांवर धोरणात्मक निर्णय होण्यासाठी जिल्हा भाजपच्यावतीने मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांचे लक्ष वेधण्यात आले होते. शासनाकडून मच्छीमार धोरण २०१९ बनविले जाणार आहे. त्यासाठी मच्छीमार समाजातील समाजातील समस्यांबाबत सूचना शासन दरबारी पोचणे आवश्यक असल्यानेच हे चर्चासत्र घेण्यात येत आहे असे मोंडकर यांनी सांगितले.
या चर्चासत्रात आरोग्य, पाणी, डिझेल परतावा, एनसीडीडी योजनेतील थकीत कर्ज, आऊटबोट इंजिन नौकांना अनुदान, महिला मच्छीमारांच्या विविध समस्या, मासळीला हमीभाव मिळणे, मासे टिकून राहण्यासाठी शितपेटीची व्यवस्था, रापण संघातील मच्छीमारांसाठी पेन्शन योजना राबविणे, किनारपट्टीवर बंधारे मजबुतीकरण करणे तसेच गरीब मच्छीमार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासह अनेक समस्या चर्चासत्रात प्रामुख्याने मांडल्या जाणार आहेत. किनारपट्टी मच्छीमारांच्या हक्काची होण्यासाठी मासेमारी क्षेत्र जाहीर केले जावे अशी मागणी शासनाकडे केली जाणार आहे असेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.
चर्चासत्रातील मुद्द्यांचे संकलन करून त्यांचा समावेश मच्छीमार धोरणात करण्यात यावा यासाठी मत्स्योद्योगमंत्री श्री. जानकर यांची मच्छीमार समाजातील निवडक प्रतिनिधींसमवेत भेट घेतली जाणार आहे. आगामी काळात भाजपच्या माध्यमातून मच्छीमार धोरणावर काम करताना किनारपट्टीवर नीलक्रांती करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments