आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत मदतीसाठी प्रत्येक घाटात जेसीबी ठेवावा : दीपक केसरकर

243
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता. ०७ : पावसाळी हंगामात करूळ, भूईबावडा, फोंडा, तिलारी आदी जिल्ह्यातील घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशा वेळी त्वरीत कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम होऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत व्हावा, यासाठी या सर्व घाटात जे.सी.बी. व आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीत केली.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पत्तन, बंदर, एस. टी. आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तिलारी जलविद्युत मोठा प्रकल्प, तीन मध्यम तर ३० लघू पाटबंधारे प्रकल्पांच्या सद्य स्थितीबाबत आढावा घेऊन पाटबंधारे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे अशी सूचना करून पालकमंत्री म्हणाले की, पूरस्थितीत तात्काळ मदत कार्य करण्यासाठी सात नौका आहेत. आणखीन आठ नौका खरेदीचा प्रस्ताव द्यावा. किनारपट्टी व नद्यांच्या जवळील ग्रामपंचायतींना लाईफ जॅकेट वितरीत करावेत, शाळांच्या इमारतींची तपासणी शिक्षण विभागाने करावी व धोकादायक इमारती किंवा खोल्या असतील याबाबत आवश्यक उपाययोजना तात्काळ करावी, साथ रोगाबाबत आरोग्य यंत्रणेने पुरेसा औषध साठा याची खात्री करावी, संपर्कसाठी वायरलेस सेट तयार ठेवावेत, नगरपालिकांनी वूड कटर तसेच नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरू ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्ष व तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष सुरळीत सुरू राहतील याची दक्षता जिल्हा आपत्ती कक्षाने घ्यावी, किनारपट्टी भागात उधानाच्या वैळी समुद्राचे पाणी शिरून लोकवस्तयांचे नुकसान होते याबाबत बंदर व पत्तन विभागाने वाळू पोती ठेवून अडसर घालावा, आदी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

\