कुडाळ, ता. ०७ : तेर्सेबांबर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात सांगली येथील चालक जागीच ठार झाला. संदीप अनिल बराडे (वय ३० राहणार जय हिंद कॉलनी सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या क्लिनर हा किरकोळ जखमी झाला आहे.
ही घटना काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद नाही. संबंधित गाडीत असलेला क्लीनर चुकीची माहिती देत असल्यामुळे तपास कामात अडथळे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या क्लीनरच्या म्हणण्यानुसार मालक असलेले संदीप बराडे हेच गाडी चालवत होते त्यामुळे अद्याप पर्यंत चौकशी सुरू आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला. या बाबतची माहिती कुडाळ पोलिस ठाण्याचे हवालदार श्री झारापकर यांनी दिली.