शिरोडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
वेंगुर्ले, ता.७ : विद्यार्थ्यांनी पुढील कारकीर्द यशस्वी होण्यासाठी आता पासूनच कष्ट घेतले पाहिजेत, कारण १७ ते २३ हा ६ वर्षाचा कालावधी आपले व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी, अत्यंत योग्य असा काळ असतो. मोबाईल चा वापर केवळ टाईमपाससाठी व आईवडिलांना फसवून गैरवापर करण्यासाठी न करता अभ्यासासाठी व सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी करावा. करिअर मध्ये यश मिळवायचे असेल तर कष्टा शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन सरपंच मनोज उगवेकर यांनी केले.
शिरोडा ग्रामपंचायतितर्फे गावातील प्रथम तीन क्रमांकाने १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण विदयार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १२वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली कु.मनाली पणशीकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंच रवी पेडणेकर, ग्रा.पं.ग्रामविकास अधिकारी श्री.सुनील चव्हाण, सदस्य दिलीप गावडे, संजय फोडनाईक, कौशिक परब, राहुल गावडे, निलेश मयेकर, गुणाजी अमरे, श्रीम.तृप्ती परब, समृद्धी धानजी, विशाखा परब, वेदिका शेट्ये, प्राची नाईक, रोहिणी खोबरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच श्री. रवी पेडणेकर यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर उपस्थित ग्रामस्थांना काजूची रोपे वाटून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या समारंभाचे सूत्रसंचलन शिरोडा ग्रा.पं.ग्रामविकास अधिकारी श्री.सुनील चव्हाण यांनी केले.