ठेकेदार व अधिकार्‍यावर पालकमंत्री गुन्हे दाखल करणार का? : रणजित देसाई

2

तेर्सेबांबर्डेत झालेल्या अपघाताला जबाबदार कोण?

कुडाळ / राजवीर पाटील, ता. ०७ : येथील तेर्सेबांबर्डे-मळावाडीमध्ये झालेला अपघात हा महामार्गाचे ठेकेदार व प्रशासनाचा बळी आहे. त्यामुळे आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणारे दिपक केसरकर आता ठेकेदारावर गुन्हे दाखल करतील का असा प्रश्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केला आहे.
सकाळी तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे मालवाहू ट्रक चिखलात रुतल्याने अपघात झाला होता. त्या ठिकाणी चालक जागीच ठार झाला होता. याबाबतची माहिती मिळताच श्री. देसाई यांनी त्या ठिकाणी जावून भेट घेतली. यावेळी कुडाळ स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा साईल, बांब सरपंच नागेश परब, वालावल सरपंच निलेश साळसकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. देसाई म्हणाले, महामार्गाच्या विषयावरून आंदोलन करणार्‍या आमदार राणे यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचे काम पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आपला नाकर्तेपणा उघड होऊ नये यासाठी त्यांनी हा प्रकार केला असला तरी सर्वसामान्य जनता दुधखुळी नाही. त्यांनी काल झालेल्या बैठकीत अभियंता व ठेकेदारावर कारवाई करू असा इशारा दिला होता. मग आता केसरकर प्रशासन व ठेकेदाराला जबाबदार धरणार का असा प्रश्न त्यांनी केला. येत्या दहा दिवसात कुडाळ परिसरातील महामार्ग वाहतुकीस सुरळीत करा, अन्यथा शांततेत व सनदशीर मार्गाचे आंदोलन कसे करतात हे केसरकरांना दाखवून देऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

17

4