देवबाग ख्रिश्चनवाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आम. नाईक यांच्याकडून दगड उपलब्ध…

181
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या कामास सुरवात…

मालवण, ता. ७ : समुद्री लाटांच्या तडाख्यात देवबाग येथील बंधारा वाहून गेल्याने अनेक घरांना धोका निर्माण झाला. परीणामी ग्रामस्थ भीतीच्या छायेत होते. याची तत्काळ दखल घेत आमदार वैभव नाईक यांनी दगड उपलब्ध केले दिले. त्यानुसार बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू झाली आहे.
किनाऱ्यावर जोरदार समुद्री लाटा धडकत असल्याने जीर्ण झालेला बंधारा अनेक ठिकाणी ढासळत असून सुटलेले दगड समुद्रात वाहून गेले आहेत. शुक्रवारी अजस्त्र लाटांच्या माऱ्यात ख्रिश्चनवाडी येथे भगदाड पडले. समद्राचे पाणी थेट वस्तीत घुसून घरांवर धडकत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण होते. ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार नाईक यांनी कोसळलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी स्वखर्चातून तत्काळ मोठे काळे दगड उपलब्ध करून दिले. कोसळलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू झाली असून आवश्यकतेनुसार अजूनही दगड उपलब्ध केले जातील. असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केल्याचे उपसरपंच तमास फर्नांडिस यांनी सांगितले.
आमदार नाईक यांनी उपलब्ध केलेले दगड शिवसेना सदस्य पिंकू फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस व स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बंधाऱ्यावर उभारण्यास सुरवात केली आहे. तर मोठे दगड उभारणीसाठी आमदार नाईक यांच्या माध्यमातून सोमवारी कामगारांचे पथक पाठविले जाणार आहे अशी माहिती शिवसेना कार्यकर्ते मकरंद चोपडेकर यांनी दिली.
गतवर्षी अनेक ठिकाणी नादुरुस्त बनलेल्या देवबाग बंधाऱ्याची दुरुस्ती आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यातून पतन विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. आणखीन ४ ठिकाणी दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अति धोकादायक ठिकाणी लाटांची तीव्रता कमी करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जिओ ट्यूबसाठी अडीज कोटी निधी मंजूर आहे. यातून ख्रिश्चनवाडी किनाऱ्यावर जिओ ट्यूब उभारणी होणार आहे.

\