कळणे नूतन माध्यमिक विद्यालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी

142
2

दोडामार्ग, ता. ०८ : सावंतवाडी संस्थानचे राजे पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते लोक कल्याणकारी राजे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविलेल्या योजना आज सरकार सक्तीने राबवित आहेत. आपल्या काळात पुढील शंभर पिढ्यांचा विचार करणारे महाराज हे भूषण होते. त्यांची आठवण राहण्यासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांना जिल्ह्यातील उपक्रम राबविताना महाराजांचे नाव द्यावे असे प्रतिपादन तेजस देसाई यांनी केले.
कळणे येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक महेंद्र देसाई, ज्येष्ठ शिक्षक उमेश राहुल, सहाय्यक शिक्षक विठ्ठल दळवी, सतीश धरणे, पत्रकार वैभव साळकर, रत्नदीप गवस आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक श्री. देसाई, ज्येष्ठ शिक्षक श्री. राहुल यांनी बापूसाहेब महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितला तर तेजस देसाई यांनी महाराज यांनी आपल्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांची आजच्या वर्तमान पिढीशी सांगड घालत वाचन चळवळ, प्रसूतिगृह, पाणी वाचवा, वनसंवर्धन, स्त्रीशिक्षण, १८९३ ची नळयोजना यांत राबविलेल्या योजना व त्यांची दूरदृष्टी सांगितली. श्री. देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना बापूसाहेब महाराज यांचा लोककल्याणकारी राजे असा उल्लेख केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षक राहुल यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश धर्णे, निकीता सावंत यांनी केले तर आभार विठ्ठल दळवी यांनी मानले.

4